सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

ओझे

ओझे
दगडाचे गाठोडे डोक्यावरती घेऊन
त्या उंच डोंगरावरती जात आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

काट्याकुट्यातून वाट काढत
प्रवास अखंड करतो आहे।।
भेटतील जे ही दगड वाटेत 
गाठोड्यात भरतो आहे।।

डोक्यावरचे ओझे कधी
खांद्यावरती घेत आहे।। 
खांद्यावरचे ओझे पुन्हा
डोक्यावरतीच जात आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

मदतीला भेटेल कोणी 
वाट त्याची पाहत आहे।।
भेटला जो ही वाटेवरती
स्वतःचेच ओझे  वाहत आहे।।

थांबलो जरी विसाव्याला
गाठोडे उशाला घेत आहे।। 
रात्रंदिवस त्याला
उभा पहारा देत आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

निम्म्या प्रवासानंतर मग 
गाठोड्याचे  ओझे वाटू लागते।।
जसा प्रवास पुढे जाईल
गाठोडेही फाटु लागते।।

घेऊन जावे का ठेऊन जावे
प्रश्न पुढे येत आहे।।
घेऊन कोणीच जात नाही
येथे दगडच शिल्लक राहत आहे।।

त्या दगडांचे मग पुन्हा
उंच डोंगर होत आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा