सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

ओझे

ओझे
दगडाचे गाठोडे डोक्यावरती घेऊन
त्या उंच डोंगरावरती जात आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

काट्याकुट्यातून वाट काढत
प्रवास अखंड करतो आहे।।
भेटतील जे ही दगड वाटेत 
गाठोड्यात भरतो आहे।।

डोक्यावरचे ओझे कधी
खांद्यावरती घेत आहे।। 
खांद्यावरचे ओझे पुन्हा
डोक्यावरतीच जात आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

मदतीला भेटेल कोणी 
वाट त्याची पाहत आहे।।
भेटला जो ही वाटेवरती
स्वतःचेच ओझे  वाहत आहे।।

थांबलो जरी विसाव्याला
गाठोडे उशाला घेत आहे।। 
रात्रंदिवस त्याला
उभा पहारा देत आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

निम्म्या प्रवासानंतर मग 
गाठोड्याचे  ओझे वाटू लागते।।
जसा प्रवास पुढे जाईल
गाठोडेही फाटु लागते।।

घेऊन जावे का ठेऊन जावे
प्रश्न पुढे येत आहे।।
घेऊन कोणीच जात नाही
येथे दगडच शिल्लक राहत आहे।।

त्या दगडांचे मग पुन्हा
उंच डोंगर होत आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

नको कांगावा पाणी ओतायचा
झोपडी केव्हाची पेटुन गेली
आता लावतेस मलम कशाला
जखम काळजाला आतुन झाली

करू नकोस आरोप कोणावर
चुक तर माझ्याच हातून झाली
मी विश्वास ठेवला त्या पहाटेवर
जी आंधाराला रात्रीच भेटुन गेली

..... sandip s. jagtap



सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

गेली आहेस तु, जेव्हा रूसून माझ्यावर
गझलही रुसली, तेव्हा पासुन माझ्यावर

sandip s. jagtap

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४


तीला वाटले, आज कविता केली नाही
म्हणजे तीची आठवणच आली नाही
कसे सांगु तुला आजुन तु
डोळ्यासमोरूनच गेली नाही

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

कविता माझ्या तिला खोट्या वाटतात
कविता माझ्या तिला छोट्या वाटतात
म्हणून पाहिला संग्रह जुनाच ऊचकुन
कविता मला माझ्या एकट्या वाटतात

...... sandip s. jagtap

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

नको तुझा होकार आता

नको तुझा होकार आता

नको तुझा मला नकार आता
नको तुझा मला होकार आता
झाले गेले सारे विसरून जा
नको चर्चा सारी मोकार आता

होती गरज कधी माझीही तुला
झालो आहे बघ बेकार आता
साथ सोडली वेळेनेही जेव्हा
शिकारीच झाला शिकार आता

...... sandip s. jagtap